बलात्कार करून तरुणीला जिवंत जाळलं

वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यात २० वर्षांच्या युवतीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. २५ ऑक्टोबरला हा दुर्दैवी प्रकार घडला. मुलीच्या वडिलांनी याबाबत काल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन शेंदूरकरला अटक करण्यात आलीय. मात्र यामध्ये तोही भाजला असल्यानं त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 29, 2013, 04:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, समुद्रपूर/वर्धा
वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यात २० वर्षांच्या युवतीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. २५ ऑक्टोबरला हा दुर्दैवी प्रकार घडला. मुलीच्या वडिलांनी याबाबत काल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन शेंदूरकरला अटक करण्यात आलीय. मात्र यामध्ये तोही भाजला असल्यानं त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
समुद्रपूर तालुक्यातील गव्हा (कोल्ही) या लहानशा गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून नराधमानं तिला जिवंत जाळलं. २५ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी सचिन शेंदूरकर याला समुद्रपूर पोलिसांनी धोंडगाव इथून अटक केली.
२५ ऑक्टोबरला समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावरुन दोन कि.मी. अंतरावरील गव्हा इथं सदर युवती घरी एकटीच होती. ही संधी साधून गावातल्याच सचिन शेंदूरकर यानं तिच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला. तो इतक्यावरच थांबला नाही. त्यानं युवतीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं. युवतीचे वडील-आई शेतात, तर भाऊ कंपनीत कामाला गेला होता. घटनेची माहिती मिळताच तिचे आई-वडील घरी धावून आले. त्यांना आपली मुलगी जळालेल्या अवस्थेत अंगणात पडून असल्याचं निदर्शनास आलं.
घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तिला लगेच हिंगणघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण ती गंभीररीत्या भाजल्यानं तिला सेवाग्राम रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सेवाग्रामला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
आपल्यावर सचिन शेंदूरकर यानं बळजबरी केली आणि नंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं, असं पीडित तरुणीनं मृत्यूपूर्वी सांगितलं, असं तिच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. मृतकाच्या घरी सापडलेला मोबाईल सचिन शेंदूरकर याचा असल्याचे तक्रारीत तिच्या पित्यानं नमूद केलंय. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.