www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
राज्यातल्या ८ जिल्ह्यात सुरु असलेली राजीव गांधी जीवनदायी योजनेचा विस्तार आता संपूर्ण राज्यात करण्यात येतोय. या योजनेचा लोकार्पण कार्यक्रम काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार असून महत्वाच्या शस्त्रक्रिया या माध्यमानं मोफत होणार आहेत. राज्यातल्या ९५% जनतेला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केलाय. या निमित्तानं होणारी जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय.
काँग्रेसच्या या महत्वकांक्षी योजनेला सुरुवात होण्यापूर्वीच ग्रहण लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण ऐनवेळी त्यांनी आपलं येणं रद्द केलंय. दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे काँग्रेसचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप भाजपनं केलाय.
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेपाठोपाठ आता राज्य सरकारची जीवनदायी आरोग्य योजना सुरु होतीय. या योजनांच्या निमित्तानं निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागलेत हे निश्चित
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.