झी स्पेशल :...या आहेत मुंबईच्या आत्तापर्यंतच्या महिला महापौर!

मुंबईचं महापौरपद हे मोठं प्रतिष्ठेचं पद... या महानगरी मुंबईचं आत्तापर्यंत सहा महिलांनी महापौरपद सांभाळलंय. या सहा महिलांनी मुंबई महापालिकेचा कारभार कसा केला त्याचा हा आढावा...

Updated: Feb 10, 2017, 06:29 PM IST
झी स्पेशल :...या आहेत मुंबईच्या आत्तापर्यंतच्या महिला महापौर! title=

मेघा कुचिक, मुंबई : मुंबईचं महापौरपद हे मोठं प्रतिष्ठेचं पद... या महानगरी मुंबईचं आत्तापर्यंत सहा महिलांनी महापौरपद सांभाळलंय. या सहा महिलांनी मुंबई महापालिकेचा कारभार कसा केला त्याचा हा आढावा...

सुलोचना मोदी - पहिल्या महिला महापौर

आत्तापर्यंत या मायानगरीची धुरा सहा कारभारणींनी सांभाळलीय... मुंबईला पहिली महापौर मिळाली ती 1956 साली काँग्रेसच्या सुलोचना मोदींच्या रुपानं... पण त्या महापौरपदावर फक्त एक महिनाच होत्या.

निर्मला सामंत-प्रभावळकर

त्यानंतर काँग्रेसच्या निर्मला सामंत-प्रभावळकर 1994 मध्ये महापौर झाल्या. पेशानं वकील असलेल्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांची ओळख झोपडपट्टीत फिरणाऱ्या महापौर अशी होती. बुद्धिवादी अशी प्रतिमा असलेल्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांना नागरी समस्यांचा चांगला अभ्यास होता. महिलांचे प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडले. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या काम करायच्या, असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं.

विशाखा राऊत

1997 साली विशाखा राऊत यांच्या रुपानं शिवसेनेला पहिली मुंबई महापौर मिळाली. विशाखा राऊत यांची प्रतिमा डॅशिंग होत्या. महापालिका कायद्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्या निष्पक्षपणे सभागृह चालवायच्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत सकस आणि अभ्यासपूर्ण चर्चा सभागृहात व्हायच्या.

शुभा राऊळ

2007 मध्ये डॉक्टर शुभा राऊळ यांनी महापौरपद सांभळलं. समुद्रामध्ये गणपती विसर्जन करू नये,  अशी त्यांची भूमिका होती. तसंच 18 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती असाव्यात, असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, त्यांच्याच शिवसेना पक्षाकडून या भूमिकेला विरोध झाला. त्यामुळे हे दोन्ही निर्णय त्यांना अंमलात आणता आले नाहीत. गणेश विसर्जनासाठी पहिल्यांदा महापौर बंगल्यात कृत्रिम तलाव शुभा राऊळ यांच्याच पुढाकारानं उभारण्यात आले. तंबाखुमुक्त मुंबई आणि हुक्का पार्लर बंद करण्याची मोहीम त्यांनी उघडली होती. यासाठी त्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाही भेटल्या होत्या. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शुभा राऊळ यांचं या धडक मोहिमेसाठी कौतुक केलं होतं.

श्रद्धा जाधव

2009 साली महापौर झालेल्या श्रद्धा जाधव यांनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. मात्र, आरक्षित भूखंडांमुळे त्यांना वादग्रस्त ठरवण्यात आलं. आरक्षित भूखंड पालिकेने खरेदी का करावेत ? असा प्रश्न उपस्थित करून ते प्रस्ताव ते नाकारत. मात्र विरोधी पक्ष आणि त्यांच्याच पक्षाच्या काही नगरसेवकांच्या दबावापुढे त्यांनी अखेर खरेदी नोटीस मंजूर केली. हा विषय चांगलाच वादग्रस्त ठरला.

स्नेहल आंबेकर

विद्यमान आमदार स्नेहल आंबेकर या गाजल्या त्या त्यांच्या विचित्र आणि वादग्रस्त विधानांमुळेच... स्वाईन फ्लू झाडांमुळे पसरतो, अशी अनेक धक्कादायक विधानं त्यांनी केली. याशिवाय निधी वाटपातल्या अनियमिततेचा त्यांच्यावर आरोप झाला. 

मुंबईला लाभलेल्या या सहा महिला महापौरांमध्ये सगळ्यात चांगला कार्यकाळ डॉक्टर शुभा राऊळ यांचा झाल्याचं जाणकारांचं मत आहे. तसंच विशाखा राऊत आणि निर्मला सामंत-प्रभावळकर यांनाही जास्त काळ मिळाला असता, तर त्यांनाही चांगल्या कामगिरीची संधी मिळाली असती, असंही जाणकार सांगतात. 

आत्तापर्यंत मुंबईच्या विकासात या सहा महापौर महिलांचा मोलाचा वाटा राहिलाय. भविष्यात हुशार आणि सक्षम कारभारणी मुंबईची धुरा सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.