झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!

लाचखोरांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नामी शक्कल शोधून काढलीय. लाचखोरीचा व्हिडिओच त्यांनी आता झी मीडियाला उपलब्ध करून दिलाय. लाच कशाप्रकारे मागितली जाते आणि घेतली जाते ते या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. 

Updated: May 27, 2015, 09:10 PM IST
झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर! title=

मुंबई : लाचखोरांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नामी शक्कल शोधून काढलीय. लाचखोरीचा व्हिडिओच त्यांनी आता झी मीडियाला उपलब्ध करून दिलाय. लाच कशाप्रकारे मागितली जाते आणि घेतली जाते ते या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. 

लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रचंड मेहनत घेतंय... पण लाचखोरांवर हवा तसा अंकुश बसवण्यात यश आलेलं नाही. अशा लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी विभागानं आता नामी उपाय शोधून काढलाय. लाचखोरीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून, त्यांचं कृत्य जगासमोर आणण्याचं... 

अशा प्रकारचा पहिलाच व्हिडिओ एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी 'झी मीडिया'ला उपलब्ध करून दिलाय. नांदेड जिल्ह्यातल्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत हिनं कशा पद्धतीनं लाच घेतली, त्याचं हे रेकॉर्डिंग... ग्राम पोषण पुरवठा आणि स्वच्छता समिती मौजे शेलगाव खुर्द योजनेच्या 75 लाखांचं कंत्राट मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शनला देण्याचे आदेश होते. पण, अॅडव्हान्स मिळालेल्या 20 लाख रुपयांच्या चेकवर सही करण्यासाठी सरपंच शोभाबाईनं 1 लाखांची लाच सचिवाकडे मागितली. हाच सगळा प्रकार 'झी मीडिया'च्या हाती लागलाय. 

तुम्हीही करा तक्रार... पाठवा लाचखोरांचे व्हिडिओ!
सरपंच शोभाबाईचा लाचखोरीचा सर्व प्रकार जसा कॅमेऱ्यात कैद झालाय. अशाच प्रकारे तुम्हीदेखील लाच घेणाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन एसीबीला पाठवू शकता. तसं आवाहनदेखील एसीबीचे महासंचालक प्रविण दिक्षित यांनी केलंय. 

लाचखोरीची तक्रार केल्यापासून आरोपींना अटक होईपर्यंत झालेला खर्च एक महिन्याच्या आत मिळवून देण्याचं वचन एसीबीनं दिलंय. एवढंच नव्हे तर ज्या कामासाठी तुमच्याकडे लाच मागितलीय ते कामही पूर्ण करुन देण्याचं आश्वासन एसीबीनं दिलंय.

लाचखोरीला आळा घालणं हे तुमच्या आणि आमच्या हातात आहे.  लाचखोरांच्या विरोधात, कोणतीही भीती न बाळगता, तुम्ही त्यांची तक्रार 

  • एसीबीच्या 1064 या हॉटलाइनवर करू शकता.

  • किंवा व्हिडिओ एसीबीला पाठवू शकता

  • किंवा www.acbmaharashtra.net हे मोबाईल अॅप डाऊनलोड करुन एका क्लिकवर भ्रष्टाचाराची तक्रार तुम्ही करू शकता.  

  • तसंच www.acbmaharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊनही आपण तक्रार करु शकता.

  • शिवाय, एसीबीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातूनही आपण लाचखोरीची तक्रार करु शकता

 
भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एसीबी आणि 'झी मीडिया'नं ही खास मोहीम हाती घेतलीय. मग बघता काय, व्हा सामील या मोहीमेत...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.