www.24taas.com, मुंबई
`झी 24 तास` या अग्रेसर वृत्तवाहिनीनं सामाजिक बांधिलकी नेहमीच जपलीय. प्रसिद्धीपासून दूर राहून, सामाजिक क्षेत्रासह विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या गुणवंतांचा `झी 24 तास` दरवर्षी अनन्य सन्मान देऊन गौरव करतं. `झी 24 तास`चा अनन्य सन्मान सोहळा 2012 या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जीवनगौरव देण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजकार्यासाठी जालन्यातील अर्चना गरड, पर्यावरणासाठी सिन्नरची पर्यावरण संस्था, कलेसाठी सिंधुदुर्गातील अप्पा दळवी, शौर्यासाठी पनवेलची निसर्गमित्र यांचा अनन्य सन्मानं गौरव करण्यात आला.
तसंच कृषी क्षेत्रासाठी ज्योती पानदुगे, शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी सुनीता महाले आणि क्रीडा क्षेत्रासाठी दिलीप पाटील, यांनाही अनन्य सन्मान प्रदान करण्यात आले. या सोहळ्यामध्ये प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्मयोगींचा सन्मान करण्यात आला. दशावतारी कलेसाठी आयुष्य वेचणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आप्पा दळवींना विनोद तावडेंच्या हस्ते मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आले. तर बालविवाहाच्या प्रथेविरोधात काम करणा-या जालना जिल्ह्यातील अर्चना गरड यांना विनोद तावडेंच्या हस्ते समाजसेवेसाठीचा अनन्य सन्मान देऊन गौरव केला.