www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विक्रोळीत पोलीस भरतीवेळी एका परीक्षार्थीचा उन्हात धावताना मृत्यू झालाय. अंबादास सोनावणे असं त्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून परीक्षार्थी आले होते. त्यांच्यासाठी पाणी पिण्याचीही सोय नव्हती. परीक्षार्थींना सावलीत बसण्यासाठीही कुठलीही सोय करण्यात आली नव्हती.
मुंबईमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान घाटकोपर ते मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. याच चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या अंबादास सोनावणे या २७ वर्षीय उमेदवारचा आज सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलीस भारती प्रक्रियेच्या नियोजनाचा अभाव अंबादास सोनावनेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच म्हटलं जातंय. संपूर्ण महाराष्ट्रातून हे उमेद्वार येथे आले असताना त्यांच्यासाठी साधं पिण्याच्या पाण्याचीही सोय केली नव्हती, अशी माहिती इतर उमेदवारांकडून मिळतेय.
मुळचा मालेगावचा अंबादास सोनावणे पाच किलोमीटरच्या धावण्याच्या चाचणीत साध एक किलोमीटर अंतरही पार करू शकला नाही. डांबरी रस्ता आणि त्यात उन्हाच्या झळ लागून सोनावणे जागीच कोसळला परंतु त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अंबादासच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
नियोजनाचा अभाव...
६ जून पासून २३ जून पर्यंत मुबईसह ठाण्यामध्ये नवीन पोलिस भारती प्रक्रिया सुरु असून त्यासाठी सबंध राज्यातून जवळपास लाखो उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे उमेदवार भारती प्रक्रियेसाठी येणार हे माहित असूनही त्यांची कुठल्याही प्रकारची सोय केली गेलेली नव्हती. येणारे उमेदवार हे भर उन्हात बसून आपली वेळ कधी येईल? याची वाट पाहत बसतात. रात्री डासांचा प्रचंड त्रास त्यात शौचालयाची प्रचंड गैरसोय यामुळे त्रासलेल्या उमेदवारांच्या तब्येतीवर आणि त्यांच्या क्षमतेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यातच डांबरी रस्त्यावर ५ किलोमीटर भर उन्हात या उमेदवारांना धावावं लागतं...
जेवण्यासाठी उमेदवारांना त्यांचे बहुतांश पैसे खर्च करावे लागतात. पोलीस सेवेसाठी शारीरिकदृष्ट्या पौष्टिक अन्नाची गरज असताना हे उमेदवार पैश्यांअभावी वडा पाव आणि रस्त्यावरच्या गाड्यांवर आईस्क्रीम खाऊन स्वतःची तहान आणी भूक भागविताना दिसत आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने त्वरित पाऊले उचलून येणाऱ्या उमेदवारांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी उमेदवारांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.