मुंबई : 'खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पुछे बता तेरी रजा क्या है...' रेश्मा बानू कुरेशीला बघितलं की, या ओळींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही...
एखाद्याच्या मनाचं धैर्य किती असावं... याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुर्ल्यातल्या झोपडपट्टीत राहणारी रेश्मा बानू कुरेशी... आपल्यासोबत एवढी मोठी दुर्घटना घडूनही, कोणतीही चूक नसताना अॅसिड हल्ल्याला सामोरं जावूनही रेश्मा खंबीरपणे उभी आहे ती अॅसिड बॅन करणा-या कॅम्पेनसाठी...जे आपल्या सोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये यासाठी ती लढतेय... तिने केवळ बिकट प्रसंगावर मात केलीय असं नाही तर संकटालाच आपल्यासमोर लोटांगण घालायला भाग पाडलंय.
मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या रेश्माची कहाणी काळजाला भिडणारी आणि प्रेरणा देणारी आहे... उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आपल्या बहिणीची सासरच्या जाचातून सुटका करण्यासाठी रेश्मा अलाहाबादला गेली होती. तो दिवस ती कधीच विसरु शकणार नाही. कारण याच दिवशी तिचं आयुष्यच बदलून गेलं.
१९ मे २०१४ ला रेश्माच्या बहिणीच्या नवऱ्याने रेश्मा आणि तिच्या बहिणीवर अॅसिड फेकलं. या अॅसिड हल्ल्यात रेश्माचा संपूर्ण चेहरा भाजला होता. कुटुंबांनी तर सगळीच आशा सोडून दिली होती. रेश्माही पूर्णपणे कोलमडून गेली होती. या धक्क्यातून सावरण्यासाठी रेश्माला तब्बल आठ महिने लागले. मात्र, यात तिला मदत झाली ती 'मेक लव्ह नॉट स्केअर' या स्वयंसेवी संस्थेची...
परिस्थितीपुढे न झुकता रेश्माने पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. जो चेहरा जगाने नाकारला होता तोच चेहरा 'अॅन्ड अॅसिड सेल' या अॅसिड हल्ल्याविरोधातील कॅम्पेनचा प्रमुख चेहरा बनला. रेश्माच्या या व्हिडिओनं लाखो लाईक्स मिळवलेत. जवळपास वर्षभर रेश्मा या जाहीरातींच्या माध्यमातून अॅसिड बंदीसाठी प्रयत्न करत असून शेवटपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा निश्चय तिने केलाय.
सगळं काही संपलं असल्याचं वाटत असतांना रेश्माने खचून न जाता मोठ्या धिराने नवा मार्ग शोधला. अॅसिडने तिचं भौतिक सौंदर्य हिरावून घेतलं असलं तरी तिच्या मनाचं सौंदर्य आणि तिचा दृढ निश्चय हिरावून घेवू शकलं नाही... रेश्माच्या या दृढ इच्छाशक्तीला झी २४ तासाचा सलाम...