राहुल गांधीचा महाराष्ट्र दौऱ्यातून काय साध्य?

काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा संपला.. पण त्यांच्या या दौ-यातून काँग्रेसने काय साध्य केले हा मोठा प्रश्नच आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 25, 2013, 07:40 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा संपला.. पण त्यांच्या या दौ-यातून काँग्रेसने काय साध्य केले हा मोठा प्रश्नच आहे. कारण राहुल गांधी येतात. बैठका घेतात, मंत्री आणि नेत्यांना सज्जड दम देतात, गटबाजी संपवा असे सांगतात. पण पुन्हा पाढे पंचावन्न... राहुलबाबांनी दम दिला तरी काँग्रेसमधील गटबाजी काही संपत नाही..
काँग्रेसचे राहुलबाबा सध्या मिशन 2014 वर आहेत.. काय आहे हे मिशन..? ते आहे 2014 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे.. त्याच मिशन अंतर्गत राहुलबाबांनी दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी राहुलबाबा आणि काँग्रेसने हे मिशन हाती घेतलंय. या दौ-यात राहुलबाबांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पदाधिका-यांशी वन टू वन संवाद साधला.. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी राहुलबाबांकडे नेते आणि मंत्र्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला.. या तक्रारी ऐकून राहुलबाबांनीही नेते आणि मंत्र्यांना सज्जड दम दिला आहे.
मिशन २०१४ काँग्रेससाठी महत्त्वाचे असून ते यशस्वी करण्यासाठी गटबाजीला तिलांजली द्या.. मंत्री आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या.. पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी येत्या वर्षभरात संघटनेत अभूतपूर्व बदल दिसून येतील.
अशा शब्दांत राहुलबाबांनी नेते आणि मंत्र्यांचे कान उपटले. मात्र याचा काही उपयोग होईल अशी चिन्हं नाहीत.
राहुलबाबांनी गेल्या मार्च महिन्यात मुंबईतील टिळक भवन इथेही अशाच प्रकारची बैठक घेतली होती. या बैठकीतही कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी मंत्री, नेते एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांबद्दलही तक्रारी केल्या होत्या. तेव्हाही राहुलबाबांनी असाच दम दिला. मात्र त्यांचा हा दम सुका दमच ठरला.
कार्यकर्त्यांना न जुमानणा-या नेते आणि मंत्र्यांना त्यामुळं काहीच फरक पडला नाही. मिशन 2014 साठी राहुल महाराष्ट्रात आले असले तरी त्यातून काँग्रेस संघटनेतील गटबाजी संपेल आणि कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागतील असा कोणताही कार्यक्रम या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना मिळाला नाही.
अनेक वर्षांपासून मतदारसंघावर कब्जा करणाऱ्या आणि गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांपासून काँग्रेसला वाचवा अशी विनंती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुलबाबांना केली. मात्र कार्यकर्त्यांना न जुमानणाऱ्या दिग्गज काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याची धमक राहुलबाबा दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.