www.24taas.com, मुंबई
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानं राजकारणातला शालीन आणि सुसंस्कृत चेहरा हरपलाय. लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी विविध जबाबदा-या सांभाळल्या. सर्वपक्षीय नेत्यांशी स्नेह हे विलासरावांच वैशिष्ठ्य होतं. उमदा स्वभाव, शालीन-सुसंस्कृत व्यक्तीमत्व असलेले विलासराव देशमुख... दिलखुलास, मुत्सद्दी नेते आणि कुशल प्रशासक होते.
विलासरावांची कारकीर्द
विलासराव देशमुख. बाभळगावच्या सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि पुढे केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल
मारणा-या विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. शालीन, सुसंस्कृत आणि राजबिंडं व्यक्तीमत्व असलेल्या विलासरावांचा देशमुखी थाट नजरेत भरणारा. राजकारणात मुत्सद्दीपणाचा प्रत्यय वारंवार देणा-या देशमुखांनी श्रद्धा आणि सबुरी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कायम जपली.
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावच्या प्रतिष्ठित देशमुख कुटुंबात जन्मलेल्या विलासरावांनी सुरुवातीचे शिक्षण लातूरमध्ये घेतल्यानंतर पुण्यात पदवी आणि कायद्याची पदवीही मिळवली. काही दिवस कायद्याची प्रक्टिस केल्यानंतर ते बाभळगावला परतले आणि 1974 साली सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.... त्याचवेळी पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य अशा प्राथमिक पाय-या चढतानाच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचा अनुभवही घेतला.1980 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि 1982 साली राज्यमंत्री. पुढे 1995 पर्यंत कॅबिनेटमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम राहिला.
1995 ते 1999 हा साडेचार वर्षांचा राजकीय विजनवासाचा कालखंड सोडला तर विलासरावांची कारकिर्द नेहमीच बहरत राहिली. त्यांच्या नशिबात राजयोगही भरभरून आला. 1995 साली ते आयुष्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक हरले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हादरा बसला. तेव्हा सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या मदतीनं विधान परिषदेत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण अर्ध्या मताच्या फरकानं त्यांचा पराभव झाला.काँग्रेसमधून निलंबित होण्याची नामुष्की त्यावेळी त्यांच्यावर आली. या पराभवातून विलासराव बरंच काही शिकले.
1999 साली कुणाच्या ध्यानीमनी नसताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आणि एकेकाळी काँग्रेसमधून निलंबित झालेले विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले.... आघाडी सरकार चालवताना कराव्या लागणा-या कसरती करत त्यांनी 2002 मध्ये आलेला अविश्वास ठरावही सारं कौशल्य पणाला लावून हाणून पाडला आणि सरकार वाचवलं.... पण 2003 मध्ये श्रेष्ठींच्या नाराजीमुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.... पण 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक जिंकूनही विलासरावांनी दिल्लीत वजन वापरून आणि आपलं सारं राजकीय कौशल्य पणाला लावून पुन्हा मुख्यमंत्रिपद पटकावलं.
2005 साली नारायण राणे काँग्रेसमध्ये आले आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विलासरावांना एक प्रतिस्पर्धी वाढला. पक्षातल्या स्पर्धकांबरोबरच राष्ट्रवादीतील नेत्यांची कुरघोडी परतवून लावत विलासरावांनी आपलं मुख्यमंत्रिपद खुबीनं टिकवलं.... 2008 साली तर राणेंनी उघडपणे विलासरावांच्या काही निर्णयांवर हल्ला चढवला, तेव्हा विलासरावांनीच राणेंना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता.... मात्र 2008 च्या 26-11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, तरीही वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला.
मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर वर्षभरानंतर काँग्रेसनं सन्मानानं त्यांना केंद्रात मंत्रिपद बहाल केलं आणि अनेक प्रकरणांत आरोप झाल्यानं अडचणीत येऊनसुद्धा अखेरपर्यंत त्यांचं मंत्रिपद आणि दिल्लीतलं वजन कायम राहिलं.... सानंदा सावकारी प्रकरण असो, की सुभाष घईंना जमीन देण्याचं प्रकरण असो.... अलिकडच्या आदर्श प्रकरणातही विलासरावांना चौकशी आयोगासमोर हजर रहावं लागलं.... पण कुठल्याही परिस्थिती न डगमगता ते या सगळ्या आरोपांना सामोरे गेले.... हजरजबाबावी स्वभाव, मर्मविनोदी भाषणं यामुळे विलासराव प्रचारसभा असो की विधिमंडळातलं भाषण.... विलासराव मैदान मारून न्यायचे. राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभावही त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाला साजेसाच होता.
गोपीनाथ मुंडेंबरोबरची मैत्रीही त्यांनी शेवटपर्यंत जपली. आघाडीचं सरकार चालवताना आवश्यक असले