वर्षा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा मरीन लाईन्स इथल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2012, 10:42 AM IST

www.24taas.com, मुंबई
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा मरीन लाईन्स इथल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल मुंबईतल्या पेडररोडवरच्या प्रभुकुंज या निवासस्थानी ६ एमएम पिस्तूलनं त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. डोक्याचा उजव्या बाजूला पिस्तूल ठेवून त्यांनी गोळी झाडली.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुलीनं... वर्षानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. पार्श्वगायिका आणि पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. सोमवारी सकाळी मोलकरीण वर्षा भोसलेंच्या घरी पोहचली त्यावेळी घराचा दरवाजा कुणीही उघडत नव्हतं. त्यामुळे मोलकरणीनं ड्रायव्हरच्या मदतीनं घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी वर्षा भोसले यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सोफ्यावर पडलेला आढळला. रविवारी रात्री उशिरा वर्षा भोसलेंनी आत्महत्या केली होती. घरामधील हॉलच्या सोफ्यावर बसून ६ एमएम पिस्तूल डोक्याचा उजव्या बाजूला टेकवून त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठलीही सुसाईड नोट ठेवलेली नाही. याआधीही १९९८ साली क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आणि २००८ साली झोपेच्या गोळ्या खावून वर्षा भोसलेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटस्फोट झाल्यानंतर वर्षा भोसले डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.
वर्षा भोसलेंनी ज्यावेळी आत्महत्या केली तेव्हा घरात कुणीही नव्हतं. मात्र त्यावेळी शेजारच्यांना पिस्तुलाचा आवाज का आला नाही? असा प्रश्न पोलिसांना पडलाय. पत्रकार आणि स्तंभलेखिका म्हणून वर्षा भोसलेंनी काम केलं होतं. तसंच घराण्याचा गायकीचा वारसा त्यांनी सुरु ठेवला होता. मात्र नेमकी वर्षा भोसलेंनी आत्महत्या का केली? याबाबत पोलीस तपास करत आहेत.