बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचे ५ लाख उद्धव ठाकरेंनी दिले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबई महापालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे सुपूर्द केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 23, 2013, 10:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, cgxyR
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबई महापालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे सुपूर्द केलाय. हा खर्च मंजूर करण्यासाठी पालिका स्थायी समितीमध्ये प्रस्ताव येणार होता. त्यानंतर उसळलेल्या वादामुळे आपण व्यथित झाल्याचं सांगत उद्धव यांनी हा खर्च महापालिकेला देऊ केलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्कारानंतर आता त्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाचा वाद पुढे आलाय. त्याच वादावर पढदा टाकण्यासाठी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबई महापालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महापालिकेकडे सुपूर्द केलाय. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी शिवाजी पार्कमध्ये सीसीटीव्ही आणि मोठे एलईडी लावण्यात आले होते. त्याचा खर्च मंजूर करण्यासाठी पालिका स्थायी समितीमध्ये आलेल्या प्रस्तावाच्या बातम्या मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्या. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच व्यथित झाले आणि त्यांनी पालिकेतल्या शिवसेना नेत्यांची कानउघडणी केल्याचं समजतंय. `असा प्रस्ताव येतोच कसा`, असा सवालही उद्धव यांनी केल्याची माहिती आहे. आता याबाबत शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंना पत्र पाठवून, स्थायी समितीत हा खर्च मंजूर करून घेण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय.

हा सगळा गोंधळ झाल्यानंतर पुन्हा महापौरांनी मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानं प्रशासनानंच खर्च करण्याची भूमिका घेतलीय. त्यांमुळं या प्रस्तावाबाबत शुक्रवारच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर स्मारकाबद्दलही अनेक वाद रंगले पण शिवसेनेचीच सत्ता असलेल्या महापालिकेत अंत्यसंस्काराच्या खर्चाचा वाद पुढे यावा हे विशेष...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.