निवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...

राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 10, 2017, 07:30 PM IST
निवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट... title=

मुंबई : राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे... 

दिवसाला पाच-सहा सभा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला पाच-पाच सहा-सहा सभा घेतायत... सकाळी मराठवाड्यात... संध्याकाळी मुंबईत... सकाळी नागपूरमध्ये... दुपारपर्यंत पुण्यात... असं सध्या सुरू आहे... महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची सगळी धुरा एकट्या मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर असल्याचं दिसतंय. यामागे कारणही तसंच आहे... 

भाजपचा राज्यातील चेहरा...

भाजपामध्ये ऐकेकाळी मुंडे विरुद गडकरी गट यांचे राजकारण जोरात होते. मात्र अनेपिक्षित पणे मुंडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील भाजपाच्या राजकारणचाची सुत्रं आली. त्यातच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याने सध्या फडणवीस यांचाच चेहरा भाजप पुढे करत आहे.

शिवसेनेला एकटे घेताहेत शिंगावर...

राज्यातल्या नगर परिषद निवडणुकांची परीक्षा मुख्यमंत्री पास झालेत. आताही मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजपाचे अन्य मंत्री आणि नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये अडकून पडले असताना मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रभर झंझावाती प्रचारदौरा सुरू आहे. शिवसेनेला अंगावर घेण्याची आणि टीकांनी उत्तर देण्याची जबाबदारी आता फडणवीसांनीच थेट आपल्या अंगावर घेतल्याचं गेल्या काही सभांमधून स्पष्ट झालंय. युती तुटल्याची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांकडे ढकलून अन्य मंत्र्यांनी या प्रकऱणातून आपलं अंग काढून घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये यशाचं श्रेय आणि अपयशाची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची असेल... 

अपयश आले तर भाजपातील विरोधक सक्रीय...

अपयश आलं तर भाजपमधला मुख्यमंत्री विरोधक गट सक्रीय होऊ शकतो. सध्या गडकरींचा गट शांत आहे... एकनाथ खडसेही गप्प आहेत... हे गट खरंतर संधीची वाट बघतायत... 

मुख्यमंत्र्यांचे राजकीय भवितव्य पणाला...

उमेदवार निवडीपासून ते पक्षाचा अजेंडा ठरवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर मुख्यमंत्र्यांची छाप पडलेली दिसतेय.  आता शिवसेनेबरोबर युती तुटल्यामुळे या निवडणुकीच्या यशापयश मुख्यमंत्र्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे... मुख्यमंत्री आपलं पूर्वीचं आक्रमक राजकारणच करत रहाणार की त्यांना नमतं घ्यावं लागणार, हे या निकालांवर अवलंबून असेल.