www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील... अर्थात यासाठी तुम्हा सर्वांचीच मदत हवी आहे. म्हणून सांगते, आता तिला सावरू द्या... तिला एकटं राहू द्या... गर्दी कमी करा’ अशी कळकळीची विनवणी ‘तिच्या’ आईने केली.
शक्ती मिल कपांऊडमध्ये पाच नराधमांनी या माऊलीच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला. हा त्या मुलीवर आणि कुटुंबावर जबर आघात होता. पण या भयंकर प्रसंगातही धीरानं वागणार्याी पोटच्या पोरीची जिद्द पाहून आईनेही डोळे पुसले आणि मुलीच्या भल्यासाठी सर्वांसमोर हात जोडून विनवणी करणारं पत्र मीडियाच्या हाती दिलं. या पत्रात ही माऊली म्हणते, ‘माझ्या मुलीवर जबरदस्त मानसिक आघात झालाय.
या कठीण प्रसंगी सर्वच आमच्या पाठीशी उभे राहिले, आधार दिला. प्रसार माध्यमे आणि मुंबईसह देशभरातील नागरिकांनी संवेदनशीलता दाखवून आम्हाला ‘न्याय’ मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. तुम्हा सर्वांची भावना मी समजू शकते. पण आमच्या घरी भेटीसाठी वाढू लागलेली गर्दी त्रासाची ठरतेय. माणुसकीच्या भावनेतून तुम्ही सर्व घरी येता, सांत्वन करता; पण या गर्दीमुळे माझ्या मुलीचे मानसिक स्वास्थ्य पूर्ववत होण्यास अडसर येत आहे.
शिवाय सोसायटीतही अस्वस्थता पसरते. माझ्या मुलीला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. त्या बळावरच ती पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करेल. पण त्यासाठी तिला एकांत देण्याचीही गरज आहे. ती एकटी असेल तर लवकर सावरेल.’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.