www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून मनोहर जोशींचा पत्ता जवळपास कापल्यातच जमा आहे.. त्यांच्याजागी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्याचं समजतंय...
दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेसाठी राहुल शेवाळे यांनी जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या चर्चेमुळे मनोहर जोशी खूप अस्वस्थ झाले आहेत.
दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी पक्की खात्री असल्याने मनोहर जोशी निश्चिंत होते. मात्र, मतदारसंघात अचानक मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांची होर्डिंग लागल्याने सर अस्वस्थ झाले होते. आपल्या मनातली अस्वस्थता उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी ते गेल्या दोन दिवसांपासून `मातोश्री`च्या संपर्कात होते. मंगळवारी काही त्यांना ते साध्य झाले नाही, पण आज त्यांनी `मातोश्री` गाठून उद्धव यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं.
आपली बाजू ऐकून उद्धव हे राहुल शेवाळेंना योग्य ती समज देतील, अशी सरांची अपेक्षा होती. पण, त्यांचा अपेक्षाभंग झाला. सर आल्यानंतर उद्धव यांनी शेवाळेंनाही तेथे बोलावून घेतले. दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अद्याप लोकसभा निवडणूक जाहीर झालेली नाही. कुठच्याच मतदारसंघातला उमेदवार निश्चित झालेला नाही, मग नसते वाद कशाला?, असे कठोर बोल सुनावत उद्धव यांनी सरांना सूचक इशाराच दिला.
शेवाळे १५ मिनीटात मातोश्रीवरून निघून गेले पण, त्यानंतरही सर तेथेच होते. त्याचा फारसा काही फायदा सरांना झाला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.