धावत्या लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कठोर कारवाई

धावत्या लोकलवर फुगे मारुन प्रवाशांना जखमी करणा-या लहान मुलांवर यावेळी बाल गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यंदा असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे.

Updated: Mar 22, 2016, 10:47 PM IST
धावत्या लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कठोर कारवाई  title=

मुंबई : धावत्या लोकलवर फुगे मारुन प्रवाशांना जखमी करणा-या लहान मुलांवर यावेळी बाल गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यंदा असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे.

होळी आणि रंगपंचमीला धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार घडतात. त्यात अनेक प्रवासी जखमी होतात, काहींना गंभीर दुखापत होते. यापैकी काही दुर्दैवी प्रवाशांना कायमचं अपंगत्व देखील आलंय. अशा समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी यंदा कठोर कारवाईचा इशारा दिलाय.

कळवा ते मुंब्रा रेल्वे ट्रॅक, आनंद नगर सायन रेल्वे ट्रॅक, विद्याविहार, मशीद बंदर, ठाकूर्ली, माहिम ते सांताक्रुज रेल्वे ट्रॅक, गोरेगाव ते कांदिवली रेल्वे ट्रॅक आणि दहिसर ते मीरा भाईंदर येथे रेल्वे पोलिसांच्या १२ टीम डोळ्यात तेल घालून बंदोबस्त ठेवणार आहेत.

धावत्या लोकल ट्रेनवर फुगा मारण्याची एकही घटना २०१४ साली घडली नव्हती. पण २०१५ साली फुगा मारण्याचा एक प्रकार घडला. यंदा असा प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दक्ष आहेत.