मुंबई : मुंबईतील फ्री पार्किंग इतिहासजमा होण्याची चिन्हं आहेत. पैसे वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या बिल्डिंगखाली तसंच कुठेही गाड्या पार्क करण्याचे मनसुबे आखत असाल तर ते त्वरित थांबवावे लागणार आहेत.
कारण आगामी काळात मुंबईत घरासमोर, गल्लीत किंवा कुठेही पार्किंगसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महापालिकेच्या पेड पार्किंगच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. पालिका निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मार्चमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावरच सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी शिवसेनेला तोंडघशी पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. गिरगाव, जुहू चौपाटी आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरात मात्र विनामूल्य पार्किंग असेल.. तीन वेगवेगळ्या श्रेणींसाठी पार्किंगचे दर वेगवेगळे असणार आहेत.