शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता...

Updated: Feb 15, 2016, 07:11 PM IST
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं title=

मुंबई : प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. गिरगाव चौपाटीत मेक इन इंडिया कार्यक्रमाखाली घेण्यात आला होता.
 
या दरम्यान महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरू असताना स्टेजला आग लागल्याच्या घटनेनंतर, श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.

लोकसत्ताच्या अग्रलेखातून वर्षभरापूर्वी मदतीसाठी शेतकरी बोगस बोंब ठोकतात असं लिहिण्यात आलं होतं, तेव्हाही श्यामसुंदर सोन्नर यांनी कवितेतून लोकसत्ताच्या संपादनावर फटकारे मारले होते.

वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविता

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................

जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

- शामसुंदर महाराज सोन्नर