`स्मृतीस्थळा`वरुनही शिवसेनेची माघार

शिवसेनेनं एक पाऊल मागे येत समाधीस्थळाच्या जागेत किंचित बदल करण्याची तयारी दर्शवलीय. मात्र समाधीस्थळ शिवाजी पार्कवरच राहिल असे संकेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. शिवसेनेच्या घसरलेल्या ताकदीचा अंदाजही यानिमित्तानं आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 13, 2012, 06:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कमधल्या चौथ-याचा वाद मिटण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं एक पाऊल मागे येत समाधीस्थळाच्या जागेत किंचित बदल करण्याची तयारी दर्शवलीय. मात्र समाधीस्थळ शिवाजी पार्कवरच राहिल असे संकेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. शिवसेनेच्या घसरलेल्या ताकदीचा अंदाजही यानिमित्तानं आलाय.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर गेल्या 26 दिवसांपासून शिवाजी पार्क आणि पार्कावर अंत्यसस्कार करण्यात आलेली जागा हा वादाचा विषय ठरली होती.. स्मृतिस्थळाची तुलना रामजन्भूमीशी करत, प्रसंगी कायदा हातात घेण्याची बेताल भाषा शिवसेना नेत्यांनी वापरली, तर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनाही यानिमित्तानं एकमेकांसमोर उभी ठाकली होती.. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनीही कठोर भूमिका सोडलेली नव्हती.. अखेर मुख्यमंत्र्यांशी नागपूर अधिवेशनाच्या काळात शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर तोडगा निघण्याचे संकेत मिळू लागले आहेत.. शिवाजी पार्कचं नव्हे तर केवळ स्मृतिस्थळाचं नामांतर शीवतीर्थ असं करा, अशी मागणी शिवसेनेनं बुधवारी केली.. त्यापाठोपाठ गुरुवारी `सामना`या मुखपत्रातून उद्धव ठाकरेंनी समाधीस्थळाच्या जागेतही बदलासाठी मान्यतेचे संकेत दिलेत.. मात्र समाधीस्थळ पार्कातच राहील हेही त्यांनी स्पष्ट केलय.
समाधीस्थळावर आजही शिवसैनिक निष्ठेने हजर आहेत. हेच शिवसैनिक स्व:ताच्या हाताने शिवसेनाप्रमुखांचे समाधीस्थळ थोडे बाजूला सरकवतील. समाधीस्थळाच्या जागेत किंचित बदल झाला, तरी ते शिवतीर्थावरच राहिल. तर दुसरीकडे शिवाजी पार्क सध्या लष्कराच्या ताब्यात आहे.. 1971च्या भारत-पाक युद्धातल्या विजयाच्या निमित्तानं साजरा होणा-या विजयदिनाची तयारी इथं सुरु आहे.. मात्र चौथ-यामुळे विजय दिनाच्या आयोजनात कोणताही अडचण येत नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलंय.
लष्कराच्या या भूमिकेनं जागता पहारा देणा-या शिवसैनिकांना दिलासा मिळालाय. या वादावर आता तोडगा निघण्याची चिन्हं दिसू लागली असली तरी आधी वाद निर्माण करून नंतर नरमाईची भूमिका घेऊन शिवसेनेनं काय मिळवलं असा सवालही या निमित्तानं विचारला जाऊ लागलाय....