तुम्ही का फोन करू शकणार नाहीत?

देशात दहशतवादी हल्ले आणि कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केलीय. आता फोन करायचा असेल तर ओळखपत्र मस्ट असणार आहे. तशा सूचना पोलिसांनी मुंबईतील पीसीओ धारकांना दिल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 25, 2012, 04:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
देशात दहशतवादी हल्ले आणि कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केलीय. आता फोन करायचा असेल तर ओळखपत्र मस्ट असणार आहे. तशा सूचना पोलिसांनी मुंबईतील पीसीओ धारकांना दिल्या आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून खोटी माहिती देणे अथवा अफवा पसरविणे तसेच दहशतवादी हालचालींवर नजर ठेवता यावी यासाठी पीसीओचालकांना रजिस्टर ठेवण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी केल्या आहेत. यात फोन करणाऱ्याचे नाव, पत्ता, इतर संपर्क इत्यादी माहिती ओळखपत्र पाहून या रजिस्टरमध्ये नोंद करावी, अशा सूचना पोलिसांनी करण्यास सुरूवात केलीय.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेतील प्रवासासाठी ओळखपत्राची सक्ती केलीय. आता तशीच सक्ती ही पीसीओवर फोन करण्यासाठी केली जाणार आहे. फोन करण्यासाठी जाताना ओळखपत्र जवळ बाळगावे लागणार आहे. सध्या संपर्कासाठी मोबाईलचा सर्रास वापर होत असला तर ओळख लपविण्यासाठी पीसीओ, एसटीडी तर आयसीडी यांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलेय.

दहशतवादी कारवाया करण्यासाठी फोनच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे. त्यामुळे फोन करण्यासाठी येणाऱ्यात प्रत्येक ग्राहकांची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचे आदेश पोलिसांनी पीसीओचालकांना दिले आहेत.

दरम्यान, चुकीच्या माहितीसाठी पीसीओचालक जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाची माहिती अचूक आहे याची दक्षता पीसीओचालकाला घ्यावी लागणार आहे. तर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पीसीओंचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.