मुंबई : शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिलाय. आम्ही मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही. नाहीतर आम्ही संघर्ष करु, असा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील नवा वाद पुढे आलाय.
सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, मराठी माणसावर अन्याय झाला तर शिवसेना खासदार, आमदार संघर्ष करतील, असा इशारा खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही, आम्ही फक्त सरकार स्थिर केलंय, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
संजय राऊत प्रस्तुत आणि अतुल काळे दिग्दर्शित बाळकडू सिनेमाचा मुंबईत नुकताच प्रिमियर झाला. या प्रिमियर शोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच शिवसेना नेते, कार्यकर्त्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर स्वप्नील जोशी, सुरेश वाडकर अशा कलाकारांनीही आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी उद्धव यांनी हा इशारा दिला.
तर दुसरीकडे रामदास कदम यांनीही थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा, मुंबईत मराठी माणसाला घरं उपलब्ध करुन द्या, असं वक्तव्य रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले.
मरिन ड्राईव्हवर लावण्यात आलेल्या LED लाईट्सवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपला बाळकडू दिलंय. मरीन ड्राईव्हवरचे पांढरे लाईटस बसवण्याचा निर्णय अत्यंत निरर्थक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. मुंबईवर प्रकाश टाकणाऱ्यांचे खरंच मुंबईवर प्रेम आहे का? या लाईटमुळे मरीन ड्राईव्हच सौंदर्य लोप पावले आहे, ट्विट आदित्य ठाकरेंनी केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.