मुंबई : शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
भविष्यात पालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळं निर्णय आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादी ज्याप्रमाणे विधीमंडळात एकत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः पालिकांमध्ये विरोधात लढतात. तसं युतीबाबत होऊ नये, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, सत्तासहभागाबाबत शिवसेना भाजपमध्ये कालपासून चर्चेचं गु-हाळ सुरू झालंय. मातोश्रीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. आज पुन्हा संध्याकाळी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज चर्चा होणार आहे. काल भाजप नेते धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. रात्री शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनंत गिते यांनी सह्याद्री अतिथीगृहावर धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेच्या सत्तासहभागाचा निर्णय होईपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच राहणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या चर्चेची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनाही देण्यात आलीय. अमित शाह आज मुंबईत येणार होते. पण प्रकृतीच्या कारणास्तव ते येणार नाहीत.
शिवसेना भाजप यांच्यात पुन्हा सत्तासहभागाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आज मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र शिवसेना भाजप यांच्यात मध्यस्तीसाठी आपण आलो नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अर्थात हिंदूत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, अशीच आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.