www.24taas.com, मुंबई
शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांना ‘मनसे’ टार्गेट केलंय. मनसेच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचीच फूस मिळतेय, असा थेट आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय.
मुंबईत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आता कामगार नेते शरद राव उतरलेत. १९ फेब्रुवारीला फेरीवाले आणि ऑटोरिक्षा बंद राहणार, असल्याची घोषणा त्यांनी आज केलीय तसंच मनसेनं सुरू केलेल्या एसटी आंदोलनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीच फूस असल्याची टीका त्यांनी केलीय. ‘मुख्यमंत्र्यांनीच एसटी कामगारांचा संप घडवून आणलाय. संघटना संपवण्यासाठी मनसेला छुपा पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी हा डाव रचलाय’ असं राव यांनी म्हटलंय. ‘ज्याप्रमाणे वसंतराव नाईक यांनी शिवसेना पोसली त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मनसे पोसत आहेत, गरिब कामगारांना नेस्तनाबूत करण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी आणि मनसेनं रचलाय’ असा घणाघाती आरोप करत राव यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलंय.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या एसटी कामगार संघटनेनं भव्य मोर्चा काढला होता. हा एसटी कामगारांची प्रचलित युनियन संपवण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव होता, असं शरद राव यांनी म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे शरद राव हे राष्ट्रवादीचे नेते आहेत तसेच ते कामगार युनियनचे नेतेही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून शरद राव यांच्यामार्फत मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मुख्यमंत्र्यांना निशाणा केलं जातंय, अशीही चर्चा यामुळे सुरू झालीय.