www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्ताने, मुंबई आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
लोकसभेचा पराभव लक्षात घेऊन शरद पवारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
शरद पवार आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले, कार्यकर्ते आणि जनतेतील अंतर वाढतंय.
नेत्यांचा कार्यकर्त्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटलाय, असंही यावेळी पवारांनी वर्धापन दिनाच्या भाषणात सांगितलं.
लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यायला हवा, तसेच मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची गरज असल्याचंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी राज्यात यावं, आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव आगामी विधानसभा निवडणुकीत घोषित करण्यात यावं, अशी मागणी आणि चर्चा सुरू झाली होती.
या चर्चेला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले आहेत, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही, आपल्या पक्षात सामूहिक नेतृत्व निवडलं जातं. राज्यात सत्ता आली तर आपण सामूहिक नेतृत्व निवडू, मी राज्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण मी केंद्रातच बरा असल्याचं यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
विकासाला माणुसकीचा चेहरा असला पाहिजे, आपण जनतेचा पुन्हा एकदा विश्वास संपादन करून दाखवूया असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.