मुंबई : सध्या परदेशात पसार झालेले मद्यसम्राट विजय माल्ल्या यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय बँकांना ९,००० कोटींचा गंडा घालणारे यांच्या किंगफिशर कंपनीच्या मालकीचे असणाऱ्या 'किंगफिशर हाऊस'चा लिलाव भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी सुरू केला.
लिलावासाठीची किमान किंमत १५० कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मुंबईतील देशांतर्गत विमानतळाजवळ ही इमारत आहे. १७,००० चौरस फूट इतका विस्तार असलेल्या या संपत्तीचा ऑनलाईन लिलाव केला जात आहे.
पण, या लिलावात संपत्तीला विकत घेण्यासाठी कोणीच पुढे आलेलं नाही. सूत्रांच्या मते पश्चिम उपनगरातील या संपत्तीची किंमत १५० कोटी रुपये ही जरा जास्तच आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा या लिलावाला सुरुवात केली जाणार आहे.
माल्ल्यांनी बुडवलेल्या हजारो कोटी रुपयांमधील निदान काही शे कोटी रुपये परत मिळवण्याची आशा राष्ट्रीय बँकांना आहे. २०१२ मध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली किंगफिशर एअरलाईन बुडीत निघाली आणि विजय माल्ल्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली. कोर्टाच्या आदेशानंतर आता त्यांच्या देशातील शक्य तेवढ्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.