मुंबई : अंनिस आणि सनातन यांच्या आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. ‘अंनिस’चे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. मानव यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हीच ते करुन दाखवा, असे प्रति आव्हान सनातनचे अभय वर्तक यांनी दिले.
श्याम मानव हे आमच्या संघटनेवर उलट-सुलट आरोप करत असून त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत. सनातन संस्थेत कुणावरही संमोहन शास्त्राचा प्रयोग केला जात नाही. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप सुरु आहेत. त्यामुळे त्यांनी एकतर आमच्यावरील आरोप सिद्ध करावेत, अन्यथा आमची माफी मागावी, असे वर्तक यांनी म्हटले.
त्याचवेळी श्याम मानव यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. मानव हे सनातनची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही कोर्टात खेचू किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी बाजू मांडताना त्यांनी सांगितले.
‘सनातन’च्या साधकांवर संमोहनाचा वापर करून त्यांना एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी ‘सनातन’च्या समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांनी केली होती. मात्र, या माध्यमातून श्याम मानव लोकांच्या मनात वैज्ञानिक गोष्टींविषयी भय उत्त्पन्न करत असून त्यांची ही मागणी विकृत असल्याचे वर्तक यांनी सांगितले.
श्याम मानव यांनीच दोन कोटी रूपयांसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली, असा आरोप सनातन संस्थेकडून मंगळवारी करण्यात आला. यावेळी संजीव पुनाळेकर यांनी सरकारी निधी मिळविण्यासाठी श्याम मानव यांनी दाभोलकरांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला. दरम्यान, ‘सनातन’च्या आरोपांना उत्तर देताना श्याम मानव यांनी ‘सनातन’चे पितळ उघडे पडल्यामुळेच ते आता माझ्यावर आरोप करत असल्याचे सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.