www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.
संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. विजेचे दर कमी न केल्यास आंदोलनाचा इशाराही निरुपम यांनी दिलाय. मुंबईतील रहिवाशांना रिलायन्स आणि टाटा कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. त्याचे दर अधिक आहेत. त्यामुळं लोकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं या दोन्ही कंपन्यांच्या ऑडिटची मागणीही निरुपम यांनी केली आहे.
विरोधकांकडून याबाबत मागणी होत काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी वीज दर कपातीची मागणी करुन मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. मात्र काँग्रेसला हे शहाणपण गेल्या १० वर्षात का सुचलं नाही? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही या मागणीचं समर्थन केलंय. वीजदर कमी व्हावेत, ही काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.