मुंबई : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा आनंद मोदींच्या विरोधकांनाच नव्हे, तर मित्रांनाही झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत ते हा आनंद लपवू शकले नव्हते. त्यानंतर आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपवर तोंडसुख घेण्यात आलंय.
'केजरीवाल जिंकले, मग हारलं कोण?' असं म्हणत चिंतन करण्याचा सल्ला भाजपाला देण्यात आलाय. 'सामना'च्या पहिल्या पानावर दिल्लीकरांनी दिले भाजपला बाळकडू अशा मथळ्याखाली दिल्लीतल्या भाजपच्या पराभवाची बातमी सामनानं दिलीय. तसंच केजरीवालांच्या तूफानात कमळाचा पाचोळा असं म्हणत भाजपाला खिजवण्याचाही प्रयत्न केलाय.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, दिल्ली विधानसभेत शिवसेनेनं १९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या सर्व १९ उमेदवारांचे मिळून शिवसेनेला ५२७३ मतं मिळाली. एक-दुसरा उमेदवार सोडला तर सेनेच्या कोणत्याही उमेदवाराला १ हजार मतांचा टप्पा ओलांडता आला नाही आणि सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. तरीही, सेनेला आपल्या पराभवाचं दु:ख नाही... पण भाजपची जिरली याचा पूरेपूर आनंद झालेला दिसतोय.
त्यानंतरही, सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय बघुयात...
दिल्लीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाही असे भाजपच्या लोकांना वाटते. जर हा पराभव नरेंद्र मोदींचा नाही तर मग तो नक्की कोणाचा? केजरीवाल जिंकले, मग हरले कोण? राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे.
दिल्लीने विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मन मोकळे केले आहे. भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव दिल्लीत झाला आहे. ज्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला शतप्रतिशत विजय मिळवून दिला त्याच दिल्लीकर जनतेने ‘आप’च्या केजरीवाल यांचा झाडू हातात घेऊन भाजपचा कचरा केला, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. राजकारण किती चंचल असते हे दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष दोन आकडी संख्या तर सोडा, एका हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्या जागाही मिळवू शकलेला नाही. याचे खापर फक्त किरण बेदींवर फोडून चालणार नाही. ज्या केजरीवाल यांना ‘भगोडा’ आणि ‘पळपुटा’ म्हणून प्रचाराचा मुद्दा बनवला त्याच केजरीवाल यांच्या पाठीशी दिल्लीची जनता का उभी राहिली? पंतप्रधान मोदी यांचे वास्तव्य आता दिल्लीतच असते, पण इतक्या जवळ असूनही यावेळी मोदी यांचे ब्रह्मास्त्र चालले नाही. अमित शहा यांची निवडणूक जादू चालली नाही. दिल्लीचा निकाल हा अनेक अर्थांनी लागलेला अनेकांचा निकाल आहे. भारतीय जनता पक्ष आमचा जुना सहकारी मित्र आहे. संपूर्ण देश त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत पादाक्रांत केला, पण देशाच्या राजधानीत त्यांचे ‘कमळ’ फुलले नाही. फक्त घोषणा व भाषणांवर निवडणुका जिंकता येत नाहीत. बूथप्रमुखांचे प्रबंधन, जातीय समीकरणे व संपूर्ण सत्ता कामास लावूनही हवे तसे निकाल घेता येत नाहीत. महाराष्ट्रातही ते घडले नाही व दिल्लीने तर सत्तेची यंत्रणा साफ झुगारून दिली आहे. भारतीय जनता पक्षातील असंतोष आणि अस्वस्थता यानिमित्ताने बाहेर पडली आहे. प्रत्येक वेळेला पक्ष कार्यकर्त्यांवर बाहेरचे उमेदवार व निर्णय लादता येत नाहीत हा पहिला धडा आणि मतदारांना गृहीत धरता येत नाही हा दुसरा धडा या निवडणुकीने दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.