रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका महिलेने रोड रोमिओला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. मोबाईल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. 

Updated: May 18, 2015, 04:00 PM IST
रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप title=

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका महिलेने रोड रोमिओला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. मोबाईल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. 

बराच वेळ त्याला चोप दिल्यानंतर ही महिला या रोडरोमीओला पोलिसांच्या ताब्यात देणार होती, मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला.  कुर्ल्याच्या कुरेशीनगर परिसरात राहणारी ही महिला शनिवारी सायंकाळी कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात आली होती. 

ही महिला मोबाइलची बॅटरी खराब असल्याने ती रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका मोबाइल दुकानात गेली. या दुकानाबाहेर हा रोडरोमीओ काही महिलांना पाहून अश्लील चाळे करीत होता. पीडित महिला या दुकानात शिरताच तोदेखील मोबाइल खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरला. 

मात्र काहीही खरेदी न करता तो या महिलेकडे अश्लील नजरेने पाहात तिला इशारे करू लागला. पहिल्यांदा या महिलेने या इमसाकडे दुर्लक्ष केले. मात्र तो महिलेकडे पाहून अधिकच इशारे करू लागल्याने महिलेने त्याला जाब विचारला. यावर या इसमाने या महिलेलाच उलट उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या या महिलेने या इसमाला दुकानातून बाहेर काढत भर रस्त्यात त्याची धुलाई सुरू केली.

कुर्ला रेल्वे स्थानकात तशी नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या घटनेच्या वेळेस देखील या ठिकाणी मोठी गर्दी होती. मात्र महिलेसोबत छेडछाड होत असताना कोणीही पुढे आला नाही. त्यामुळे या महिलेनेच या रोडरोमीओला जबर चोप दिला. त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.