निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2017, 10:39 AM IST
निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस title=

मुंबई : राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. 

डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सरकारनं सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिलंय. पण असली आश्वासनं आता कामाची नाहीत..प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोवर कामावर येणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांच्या संघटनेनं घेतलीय. 
डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटेल यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असंही संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान, बहुतांश ठिकाणी निवासी डॉक्टरांचं काम बंद असलं तरी कायम नोकरीत असणारे प्राध्यापक आणि डॉक्टर रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी केलाय. 

न्यायालयाची तंबी, जमत नसेल तर घरी बसा!

 मारहाणीची भीती वाटत असेल, तर नोकरी सोडून द्या. असं सांगत मुंबई हायकोर्टानं निवासी डॉक्टरांना फटकारलं आहे. एखाद्या कामगारासारखे वर्तन हे डॉक्टर पेशाला काळीमा फासणारे असल्याचंही कोर्टानं म्हटलेय. निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेबाबतच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. 

जे डॉक्टर ऐकत नसील त्यांची नावे कोर्टाला कळवा, असंही न्यायाधिशांनी म्हटलंय. सुरक्षेशिवाय जे निवासी डॉक्टर कामावर येत नाहीत, त्यांना कायमच्या सुट्टीवर पाठवायचे का, याबाबतचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घ्यावा, असंही कोर्टानं म्हटलय. आता याबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे.