शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलासा पण उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान

शिवसेनेच्या मंत्र्यांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवसेना पक्षातच उभी फूट पडल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मातोश्रीवरील बैठकीत सिद्ध झालंय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी आखलेली व्यूहरचना मोडून काढत शिवसेना एकसंध ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 

Updated: Apr 7, 2017, 06:11 PM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलासा पण उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान title=

मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवसेना पक्षातच उभी फूट पडल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मातोश्रीवरील बैठकीत सिद्ध झालंय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी आखलेली व्यूहरचना मोडून काढत शिवसेना एकसंध ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 

'मातोश्री'वर गुरुवारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची झालेली बैठक वरवर साधारण बैठकांप्रमाणे पार पडली असं चित्र असलं तरी ते तसं नक्कीच नाहीये. या बैठकीची पक्षाच्या इतिहासात नक्कीच नोंद ठेवली जाईल अशी चर्चा आहे. कारण खुद्द उद्धव ठाकरे यांनीच पक्षात मंत्री विरुद्ध आमदार असे दोन गट पडल्याच्या घडामोडींवर शिक्कामोर्तब केल्याचे बोललं जातंय. 

उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्र्यांना मातोश्रीच्या आतल्या खोलीत तर सर्व आमदारांना बाहेरील खोलीत बसवलं. उद्धव ठाकरेंकडून मंत्र्यांसह चर्चा आणि त्यांची कानउघडणी करण्यात आली. यावेळी योग्य काम करण्याचा मंत्र्यांना सज्जड दम देण्यात आला. मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव यांनी आमदारांशी चर्चा केली. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरील तक्रारींबाबत कल्पना असल्याचं उद्धव यांनी सांगितलं. मात्र कुणाच्याही दबावाखाली निर्णय घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निर्णय घेण्याची ही वेळ नाही, पक्षाचा विचार करुन योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा करणार का? असा सवाल उद्धव यांनी आमदारांना केला. त्यावर तुम्ही योग्य निर्णय घेणार आहात त्यामुळे आम्ही आता मंत्र्यांसमोर कशासाठी बसू? असं उत्तर आमदारांनी दिलं. बैठकीचा शेवट गोड व्हावा यासाठी काही आमदारांनी मंत्र्यांना बाहेर बोलवा असे सांगितले. त्यावेळी मंत्री बाहेर आले आणि बैठकीचा समारोप झाला. 

सत्तेत सहभागी असूनही कामं होत नाहीत. मतदारसंघात पुरेसा विकास निधी उपलब्ध होत नाही याबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे. पक्षाच्या मंत्र्यानी आमदारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्यात धन्यता मानल्याची भावना निर्माण झालीय. याप्रश्नी शिवसेना मंत्र्यानी अनेकदा मुख्यमंत्र्याची भेटही घेतली. मात्र समान निधी वाटपाच्या आश्वासनाशिवाय पदरात काहीही ठोस पडलेलं नाही. शिवसेना आमदारांच्या निधी वाटपाचे घोंगडं अजून तसंच भिजत आहे. त्यामुळे शिवसेना आमदार-मंत्र्याअंतर्गत निर्माण झालेली मतभेदांची दरी दिवसागणिक वाढतेय. ज्यामुळं मुख्यमंत्री निर्धास्त आहेत, तर शिवसेना पक्ष संघटनेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंसाठी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.