www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
न्यूयॉर्कच्या धर्तीवर आता मुंबईतही रात्रभर दुकानं आणि हॉटेल्स खुली राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कायदा समितीनं त्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवलाय. त्यावर आता विचार सुरू आहे.
या आमच्या मुंबईत आता रात्रभर हॉटेल्स आणि दुकानं खुली राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापालिकेच्या कायदा समितीनं सभागृहाला एक प्रस्ताव पाठवलाय. मुंबईत हॉटेल्स आणि दुकानं रात्रभर खुली राहिली तर मुंबईकरांची रात्री खाण्याचीही सोय होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही जाग राहील, असं या प्रस्तावात म्हणण्यात आलंय.
कायदा समितीच्या या प्रस्तावाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दिलाय. पण हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्यासाठी महापालिकेच्या शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणि बॉम्बे पोलीस ऍक्टमध्ये बदल करावा लागणार आहे. न्यूयॉर्कच्या धर्तीवर दुकानं आणि हॉटेल २४ तास खुली ठेवण्यासाठी मुंबईच्या पालकमंत्र्यांनीही अनुकूलता दर्शवलीय. पण पोलिसांवर त्याचा अतिरिक्त ताण पडेल, हा मुद्दाही विचारात घेणं गरजेचं आहे.
मुंबईकर या प्रस्तावावर खूश आहेत, त्यांनी या प्रस्तावाचं जोरदार स्वागत केलंय. मुंबई कधीच झोपत नाही, असं मुंबईबद्दल म्हटलं जातं. आता हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर मुंबईकर कधीच उपाशी झोपणार नाहीत आणि मुंबईच्या नाईट लाईफला आणखी चार चांद लागतील....
(Zee Media)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.