महापालिकेनं नाकारली सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी!

सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2013, 03:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.
सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेनेनं १३ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर `दसरा मेळावा` आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. यंदाचं या मेळाव्याचं हे ४७ वं वर्षं... शिवाजी पार्के सायलेन्स झोन म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर गेली तीन वर्षं शिवाजी पार्कवर सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात येतेय. पण, काहीतरी मार्ग काढून हा मेळावा इथं भरवण्यात येतो. गेली तीन वर्ष या मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करत हायकोर्टाच्या आदेशाला सेनेनं हरताळ फासलाय.
याआधी २०१० आणि २०११ मध्ये देखील हायकोर्टाने सभा वेळेत संपवा आणि आवाजाची मर्यादा ५० डेसिबलपेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घ्या, असे सांगत दसरा मेळाव्याला परवानगी दिली होती.
शिवाजी पार्क हा परिसर सायलेन्स झोनमध्ये येतो. त्यामुळेच दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आलीय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला चार दशकांची परंपरा आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेला हा मेळावा राज्याच्या राजकारणात देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.