www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज झाले आहेत. पण त्यांच्या नाराजीचं कारण म्हणजे त्यांचाच पक्षाच्या नगरसेवकाचं विचित्र वागणं असल्याचं समजते आहे. कल्याण पूर्व सिद्धार्थनगर भागातील पाईपलाईन नादुरूस्त असल्याने मनसे नगरसेवक नितीन निकम यांनी वृद्ध कंत्राटदाराला भर रस्त्यात मारहाण केली. आणि त्याचे तसे पुरावे उपलब्ध असतानाही त्याच्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सगळीकडूनच नाराजीचा सूर उमटतो आहे. पण नगरसेवकाच्या या कृत्यावर राज ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्व भागातल्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली म्हणून मनसे नगरसेवक नितीन निकम यांनी वयोवृद्ध ठेकेदाराला बेदम मारहाण केलीय. या नगरसेवकांनं ठेकेदाराला मारहाण करताना त्यांच्या वयाचाही विचार केला नाही. सर्वांसमोर या नगरसेवकांनं त्याच्या सात ते आठवेळा श्रीमुखात भडकावली.
तरीदेखील महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत होते. त्यांना समज देऊनही दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याने अखेर मनसे स्टाईलने योग्य ती समज देण्यात आली, असा पवित्रा घेत मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कृतीचे समर्थन केले असले, तरी नगरसेवकाच्या या कृतीमुळे राज ठाकरे नाराज झाले आहेत. त्यामुळे आता या नगरसेवकावर पक्षातर्फे काय कारवाई होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.