www.24taas.com, मुंबई
मुंबईत दिवसेंदिवस बाळ चोरीच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसून येतेय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक स्तुत्य प्रस्ताव ठेवलाय. हा प्रस्ताव यशस्वी झाला तर सगळी बाळं सुरक्षित राहणार आहेत.
मुंबईत सरकारी हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या बाळांच्या चोरींची वाढती संख्या लक्षात घेता, आता महापालिकेनं चांगली शक्कल लढवलीय. महापालिका परदेशातल्या हॉस्पिटल्समध्ये असलेली ‘इलेक्ट्रॉनिक टॅग सिस्टिम’ सुरु करणार आहे. या तंत्रज्ञानानुसार हॉस्पिटल्समध्ये इलेक्ट्रॉनिक सेंसर्स आणि बाळांच्या मनगटांवर इलेक्ट्रॉनिक टॅग लावला जाणार आहे. त्यामुळे कुणीही बाळाला घेऊन हॉस्पिटलपासून दहा मीटरच्या बाहेर घेऊन गेलं, तर लगेचच अलार्म वाजणार आहे. आणि त्या ठिकाणाची माहितीही समजू शकणार आहे. महापालिकेनं हा प्रस्ताव आरोग्य समितीकडे पाठवलाय, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय.
महापालिकेच्या या प्रस्तावला आता आरोग्य समिती हिरवा कंदील दाखवणार का, हे लवकरच कळेल. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी साधारण दहा लाखांचा खर्च होणार आहे. पण ही यंत्रणा यशस्वी झाल्यास मोठं नुकसान टळणार आहे.