www.24taas.com, मुंबई
टोलवसुलीला तीव्र विरोध करत राज्यात आंदोलनाची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. टोलप्रश्नासह मराठी शाळांच्या मुद्यावर राज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. टोलबाबत बहुतांश मुद्यावर सीएम सहमत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय.
मसेने राज्यात टोलविरोधी आंदोलन उभं केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचं धाबं दणाणले होते. मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. मात्र, टोलच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असे आक्रमक झाल्यानंतर, राज्यात चांगलाच गोंधळ उडालाय. हा टोलचा झोल बंद करण्यासाठी राज यांना मुख्यमंत्री चव्हाणांना भेटावे लागले.
पूर्वी एखादा रस्ताबांधणीचा खर्च प्रकल्प किंमत म्हणून जाहीर होत असे, मात्र आता यात काही गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. आता प्रकल्प कालावधीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी, नव्या रस्त्यांची निर्मिती, टोल नाक्यांवरील कर्मचारी त्यांचा पगार, कंत्राटदाराने टोलसाठी घेतलेले कर्ज त्यावरील व्याज या सगळ्या बाबींचा विचार करुन नव्याने प्रोजेक्ट लाईफ सायकल कॉस्ट तयार केली जाणार आहे. ही रक्कम प्रकल्प किमतीच्या चौपट पाचपट देखील असण्याची शक्यता आहे, अशी शक्यता राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
तसेच मराठी शाळांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे मत राज यांनी व्यक्त केले आहे. मराठी शाळांचा आणि टोलचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले पाहिजे, अशी मागणी राज यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मताशी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.