www.24taas.com, मुंबई
दिवसभर उकाड्याने घाम निघालेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने सुखद दिलासा दिला. मात्र, भिवंडीत दुदैवी घटना घडली. भिवंडीत वीज कोसळून तीन युवकांचा मृत्यू झाला.
सोमवारी सायंकाळी वीज कोसळून भिवंडी तालुक्यातील पालखणे गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पालखणे गावावर शोककळा पसरली आहे. पालखणे गावातील राकेश पाटील (२४), श्रीकांत पाटील (२७), अल्पेश भोईर (२२) हे तिघेजण वडपे गावी धान्य गोदामात कामाला होते. हे तिघेजण दोन टरसायकलवरून भिवंडीकडे येत होते.
पहिल्याच दिवशी ‘ऑक्टो बर हिट`चा तडाखा बसतोय या विचारांनी मुंबईकर त्रस्त झालेले असताना सोमवारी सायंकाळी सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाला. मुंबईच्या तापमानाने रविवारी तब्बल ३४ अंशांचा पारा गाठला होता. सोमवारी सायंकाळपर्यंतच्या तापमानाची नोंदही सांताक्रूझ येथे ३३.७; तर कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस इतकी झाली होती.
या तापमानवाढीच्या परिणामानेच नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि उपनगरे; तसेच ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत होता.
बंगालचा उपसागर आणि परिसरात तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई-ठाण्यासह राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. आणखी दोन दिवस मुंबई-ठाण्यासह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचे संचालक अजयकुमार यांनी वर्तवला आहे.