मुंबईत संततधार

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आज सोमवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. या पावसाचा तडाखा काहीप्रमाणात मुंबईतील रेल्वेला बसला. त्यामुळे गाड्या २० मिनिटांने उशिरा धावत होत्या. दरम्यान, येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 27, 2012, 06:02 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आज सोमवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. या पावसाचा तडाखा काहीप्रमाणात मुंबईतील रेल्वेला बसला. त्यामुळे गाड्या २० मिनिटांने उशिरा धावत होत्या. दरम्यान, येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
वांद्रे परिसरात तासाभरात २३ मिमी पाऊस झाला असून, गोवंडी परिसरात २७मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईकरांची दिवसाची सुरवातच आज पावसाने सुरू झाली. पावसामुळे मध्य रेल्वे, हार्बर मार्गावरील लोकल गाड्या व पश्‍चिम रेल्वेच्या गाड्या २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
१९ऑगस्टनंतर मुंबईसह ठाणे परिसरात पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. परळ, एलफिन्सटन भागात पाणी साचले असून मुंबईत सर्वत्र ट्रॅफिक जाम झाले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकलही धिम्यागतीने धावत आहे.
मुंबई शहर-उपनगरे तसेच ठाणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवाही आला. काही दिवस केवळ ढगांची गर्दी जमवून हुलकावणी देणा-या पावसाने रविवारी सकाळपासूनच मुंबईकरांना झोडपायला सुरुवात केली. शनिवारी रात्रीपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, वसई, नवी मुंबईच्या शहर भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीपासून केरळपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने तसेच बंगालच्या उपसागरातूनही मान्सूनला पोषक वातावरण मिळाल्याने पावसाने जोर धरल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रातून सांगण्यात आले.