www.24taas.com, मुंबई
रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन... आणि त्यामुळे नेहमीच आपल्याला त्याच्या तिकीटासाठी तिकीट खिडकीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. त्यासाठी रेल्वे सीव्हीएम कूपन ही सेवा अंमलात आणली. मात्र आता हेंच कूपन तुम्हांला दिसेनासे होणार आहेत.
प्रवाशांची रांगेपासून सुटका करणारी आणि रेल्वेला वर्षाला सव्वातीन कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी सीव्हीएम कूपन बंद होणार आहे. मार्च २०१४ पर्यंत टप्प्याटप्याने ही सीव्हीएम कूपन मध्य रेल्वेतून कायमची हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे रेल्वेकडून कळते आहे. सीव्हीएम कूपन किती विकल्या जातात याची माहिती मिळण्यात येणारी अडचण, मशीन्सच्या मेंटेन्सची समस्या तसेच त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी ही सेवा टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून मिळते आहे.
मध्य रेल्वेवर सध्या ३०० सीव्हीएम मशीन्स आहेत. २०१३ पर्यंत कमी करून त्या दोनशेवर आणण्यात येतील. त्यानंतर मार्च २०१४पर्यंत त्या सर्वच बंद करण्यात येतील. १९९८ मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात प्रथम सीव्हीएम कूपन मशिनचा प्रारंभ झाला होता.