मुंबई : रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष असे काहीही आलेले नाही. याबाबत राज्यातील शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्राचे असूनसुद्धा राज्याच्यादृष्टीने कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली नाही. याबाबत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. तर हे बजेट निराशाजनक आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले. रेल्वेची सुरक्षा आणि स्वच्छतेला दिलेले प्राधान्य याबाबी चांगल्या असल्याचे राऊत यांनी म्हटले. तर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले, त्यांनी वरच्या प्रभूंचा धावा केल्याने हे प्रभू काय देणार, हेच स्पष्ट झाले.
एनडीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे समस्यांना घेऊन महिनाभर आधीच सुरेश प्रभूंची भेट घेतली होती. परंतु, प्रत्यक्षात रेल्वेमंत्र्यांनी उपनगरीय रेल्वेसाठी कोणतीही घोषणा केलेली नसल्याने या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासह मुंबईला काहीच मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली.
राज्याच्या ग्रामीण भागासाठी काहीही योजना रेल्वेअर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न दिल्याने भ्रमनिरास झाल्याचे सांगत पूर्णपणे नाराज असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.