मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी आता ११ जुलै रोजी होणार आहे. आज राहुल गांधी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहिले होते.
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहिलेत.
विशेष म्हणजे, गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गाधींना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल यांनी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि नियोजित वेळेनुसार सकाळी ११ वाजता राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल झाले.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला उपस्थित न राहण्याचा दिलासा जरी दिला असला तरी न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे वचन मी न्यायालयाला दिले होते. त्यामुळे मी जे वचन देतो ते पूर्ण सुद्धा करतो म्हणूनच भिवंडी न्यायालयात सुनावणीवेळी हजर झाल्याचे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टोला हाणला.
लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान, राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.