www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई
निर्णय घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर नेहमीच टीकेची झोड उठवली जात असतांना, पृथ्वीराज चव्हाण आज अचानक कामाला लागले आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली, या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांनी अडीच तासात १३ निर्णयांवर शिक्कामोर्तब केला. यामुळे आमची काम होत नाहीत, असं रडगाणं गाणाऱ्या विरोधीपक्षातील आणि सत्ताधारी पक्षांतर्गत विरोधकांनाही चांगलाच आनंद झाला आहे. मात्र निवडणुकीच्या आधी आपल्या कामाशी संबंधित गोष्टींवर निर्णय झाला तर बरं होईल, याकडेही अनेकांनी डोळे लावून ठेवले आहेत.
निवडणूक आली रे
वादग्रस्त तसेच शंका वाटत असलेल्या प्रकरणांवर पृथ्वीराज चव्हाणांनी सह्या करण्यास आखडता हात घेतला आहे, अशी चर्चा होती. यावरून विरोधक, पक्षांतर्गत नेते आणि मित्र पक्षातील बडे नेतेही चांगलेच अस्वस्थ होते.
निर्णय होत नसल्याने शरद पवारही होते अस्वस्थ
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का?, असं खोचक वक्तव्यही केलं होतं. अनेकांनी हायकमांडकडे तक्रारीचं गाऱ्हाण लावणार असंही अप्रत्यक्ष म्हटलं होतं.
मात्र पदासाठी कोणतीही महत्वाकांक्षा नसतांना पद मिळाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना याचं कोणतंही सोयरं सूतक नव्हतं, म्हणून त्यांनी कुणाकडेही लक्ष दिलं नाही. मात्र निवडणुकांचं घोडामैदानजवळ आल्याने पृथ्वीबाबाही अंदाज घेऊन कामाला लागले आहेत.
कुणाच्या इशाऱ्यानंतर कामाला लागले?
मात्र मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि इच्छूक उमेदवारांची बैठक झाली. यात जनतेची कामं होत नसल्यानं आपल्याला मतं कोण देणार असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.
यानंतर पक्षाचे नेते अजित पवार यांनी काम झाली नाहीत, तर सरकारमधून बाहेर पडू, आणि बाहेरूनच पाठिंबा देऊ, असा इशारा दिला. यानंतर आज अडीच तासात मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेरा निर्णय झाल्याने आर्श्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.