www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या रस्त्यांपुढे महापालिकाच काय तर आता चक्क परदेशी यंत्रणेनंही हात टेकलेत... रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेनं दक्षिण आफ्रिकेहून आणलेली कार्बनकोर प्रणालीही सपशेल अपयशी ठरलीय. त्यासाठी तब्बल १६ कोटी खर्च झालेत. पण ते कुठे गेले, हे खड्ड्यांमधून मार्ग काढणा-या मुंबईकरांना व्यवस्थित कळतंय.
माटुंग्यामधला सेनापती बापट क्रॉस रोड.. मोगल लेन क्रॉस नंबर १ या नावानंही हा ओळखला जातो...महापालिकेनं अवघ्या चार महिन्यांपूर्वीच कार्बनकोर या प्रणालीद्वारे या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम केलं होतं...मात्र पहिल्या पावसाचा फटका बसून ही प्रणालीच पाण्यात वाहून गेलीय...आणि आता या रस्त्यावर खड्डे आपला हक्क बजावू लागलेत.
ही कार्बनकोर प्रणाली म्हणजे नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच...मुंबई महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी आतापर्यंत भारतीय तंत्रज्ञान वापरायची. गेल्या वर्षी दक्षिण अफ्रिकेच्या कार्बनकोर या प्रणालीला कामासाठी स्वीकारण्यात आलं. या कामासाठी सुमेर इन्फ्रास्ट्रक्चरला सुमारे साडेसोळा कोटी रुपयाचं कंत्राट देण्यात आलं.
या कंत्राटानुसार पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या ई विभागातला दत्ताराम लाड मार्ग, एल पश्चिम विभागातला लोकमान्य टिळक मार्ग, जी उत्तर विभाग मोगल लेन क्रॉस रोड नं. 1, एस विभाग दर्गा क्रॉस रोड रोड, टी विभाग जे. व्ही. स्कीम रोड, एच पूर्व विभाग चर्च रोड, एच पश्चिम विभाग 10 वा रस्ता, के पूर्व विभागात एमआयडीसी रोड नं 11, पी उत्तर विभाग एल. टी. रोड आणि गौतम बुद्घ रोड, आर दक्षिण विभाग खजुरिया रस्ता ते गार्डन प्लॉट रस्ता, आर मध्य विभागाच दौलत रोड, आर उत्तर विभाग संत मिराबाई रोड. या रस्त्यांची कामं करण्यात आली. पण त्यापैकी ब-याच रस्त्यांची पुरती वाट लागलीय.
सेनापती बापट क्रॉस रोडवर खड्डे बुजवण्याचं काम आज सकाळी सुरु झालं खऱं पण त्याचा दर्जा काय असेल याचा अंदाज ठेकेदाराच्या बोलण्यावरुन येईल. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था झालीय की, परदेशी तंत्रज्ञानाचाही इथं टिकाव लागत नाही. केवळ कंत्राटदारांचे बँक बॅलन्स फुगवणारे हे विदेशी तंत्रज्ञान मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये शेवटच्या घटका मोजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.