शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?

शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे. 

Updated: Nov 24, 2015, 10:08 AM IST
शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड? title=

अजित मांढरे, मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे. 

शीना बोरा हत्याकांड प्रकरण गुंतागुतीचं झालंय. पीटरची सावत्र मुलगी शीना आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्या प्रेम प्रकरणातून शीनाची हत्या करण्यात आली, असं कारण सुरूवातीला पुढे आलं होतं. या हत्येप्रकरणी इंद्राणी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. काही काळ गेल्यावर आता शीनाच्या हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीला अटक झालीय.

सीबीआयच्या तपासात पीटरवर ठेवण्यात आलेले आरोप...
- हत्येच्या दिवशी पीटर आणि इंद्राणी यांचं बराच वेळ फोनवर बोलणं झालं
- इंद्राणीने शीनाची हत्या केल्याचं पीटरला माहीत होतं
- गोवा इथे इंद्राणी आणि पीटरने शीनाचं जी-मेल अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न केला
- शीना गायब झाली तेव्हा पीटरने तिला शोधण्याचा किंवा पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला नाही. 
- पीटरने कोट्यवधींची संपत्ती जमवली कशी याबाबत माहिती लपवलीय

शीनाची हत्या करण्यामागे पीटरचं डोकं होतं, अशी एक चर्चा सीबीआय तपासात पुढे आलीय. कारण, पीटरने गोळा केलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा हा काळ्या कमाईचा होता. याबाबत शीनाला माहिती होती, अशी चर्चा आहे. तर इंद्राणीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पीटरला सांगून पीटरच्या संपत्तीतून इंद्राणीची हकालपट्टी करण्याचा शीनाचा डाव होता म्हणून शीनाची हत्या केल्याचं तपासात समोर आलंय. यात इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्नाचाही सहभाग होता. यातून बरीच मोठी गुंतागूंत समोर येते. पण आपला यात सहभाग नाही, आपल्याला गुंतवण्यात येतंय असं पीटरचं म्हणणं आहे. 

या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीटरच्या सहभागाबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. मग, त्याला मुंबई पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवाल उपस्थित होतोय. सीबीआयकडे हा तपास देण्याचं नेमकं कारण काय? या प्रश्नांची उत्तर येत्या काळात उघड झाल्यास आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.