मुंबई : अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, म्हणून येत्या पाच ते सहा वर्षात ५० ते ७० लाख नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते.
चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली असल्याने, हे परिणाम दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भीती जागतिक आर्थिक संघटनेने म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने वर्तविली आहे.
हॉस्पिटॅलिटी अर्थात सेवा उद्योगात आणि वस्तुनिर्मिती उद्योगात सध्या मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर वाढला आहे. चीन आणि जपानमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
जपानमध्ये प्रत्येक १० हजार कामगारांमागे १५०० रोबोट काम करत आहेत. हे प्रमाण येत्या काळात वाढणार असून, कामगारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होईल.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. कुशल कामगारांच्या अभावामुळे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
दावोस येथे जागतिक आर्थिक संघटनेची नुकतीच एक परिषद झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या अहवालात कौशल्य विकासाअभावी आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे असंख्य नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला आहे.