इंटरनेटवर जोडीदार शोधला खरा, तिने घातला १८ लाखाला गंडा

वयाच्या उत्तरार्धात जोडीदार शोधून आयुष्याची सेकंड इनिंग सुरु करण्याची हौस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली. इंटरनेटच्या माध्यमातून लग्नाला होकार देणा-या अमेरिकन महिलेनं त्यांना चक्क १८ लाख रूपयांना गंडा घातल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 20, 2013, 12:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वयाच्या उत्तरार्धात जोडीदार शोधून आयुष्याची सेकंड इनिंग सुरु करण्याची हौस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली. इंटरनेटच्या माध्यमातून लग्नाला होकार देणा-या अमेरिकन महिलेनं त्यांना चक्क १८ लाख रूपयांना गंडा घातल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
६१वर्षीय सुनील स्वामींचा काही वर्षांपूर्वी त्यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला. आयुष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी पुनर्विवाह करण्याचं ठरवलं. त्यानुसार वधु संशोधनासाठी त्यांनी `शादी डॉट कॉम` या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नाव नोंदवलं. अल्पावधीतच त्यांना त्यांची अपेक्षित जोडीदार मिळाली. ती देखील सातासमुद्रापार अमेरिकेत. स्वत:ला अमेरिकन सैन्यात अधिकारी असल्याचं सांगणा-या मेगन डेटवायझर या महिलेनं सुनील यांच्याशी लग्न करण्यासाठी होकार दिला.
सध्या ती अफगाणिस्तानात मोहिमेवर असल्याचंही तिनं सांगितलं. हळूहळू इंटरनेटवरून चॅटिंगच्या माध्यमातून त्यांच्यातील संवाद वाढत गेला आणि सुनील स्वामी एका वेगळ्याच सापळ्यात अडकत गेले. आपल्याकडील २० लाख डॉलर्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्याकडे दुबईमार्गे पाठवायचे आहेत, असं सांगून मेगनबाईंनी सुनील यांच्याकडूनच पैसे उकळायला सुरुवात केली.
कधी पैशांनी भरलेल्या ट्रंकचं पार्सल सोडवण्यासाठी, तर कधी कस्टम अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी म्हणून तिनं सुनील यांना वेळोवेळी, आणि तेही वेगवेगळ्या बँक अकाऊंटमधून पैसे भरायला भाग पाडले. कधी २ लाख रूपये, कधी ४ लाख रूपये असं करता करता सुनील स्वामी यांचे तब्बल १८ लाख रुपये या महिलेनं हडप केले. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुनील स्वामी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सुनील स्वामी यांची झालेली फसवणूक हा सायबर क्राइमचा भाग आहे. नायजेरियन फ्रॉडचाच हा नवीन प्रकार असल्याचं समोर आलंय. अनेक सुशिक्षित तसेच उच्च पदस्थ लोक अशा गुन्ह्यांचे शिकार ठरतात. पुण्यामध्ये यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे किमान या घटनेपासून धडा घेऊन इतरांनी वेळीच शहाणं होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.