..अन्यथा फाशीपर्यंत पोहोचवू, पोलिसांनी धमकावल्याचा समीरचा आरोप

 ‘साहेबांचा निरोप आहे. २५ लाख रुपये देतो अन् माफीचा साक्षीदारही करतो. पण आम्ही सांगतो त्याचे नाव ब्रेनमॅपिंगमध्ये घे, म्हणजे प्रकरणही संपेल; 

Updated: Nov 22, 2015, 10:54 AM IST
..अन्यथा फाशीपर्यंत पोहोचवू, पोलिसांनी धमकावल्याचा समीरचा आरोप title=

काँ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर :  ‘साहेबांचा निरोप आहे. २५ लाख रुपये देतो अन् माफीचा साक्षीदारही करतो. पण आम्ही सांगतो त्याचे नाव ब्रेनमॅपिंगमध्ये घे, म्हणजे प्रकरणही संपेल; अन्यथा तुला फाशीपर्यंत पोहोचवू, अशी धमकीवजा ‘ऑफर’ पोलिसांनी दिली आहे, असा गौप्यस्फोट कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कळंबा कारागृहात असलेल्या समीर गायकवाड याने आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात केला. 

समीरला न्यायालयात हेच गोपनीय सांगायचे होते का? तो ‘साहेब’ कोण? या चर्चेने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली असून, याबाबतचा अहवाल येत्या ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचा आदेश तपास यंत्रणेला दिला आहे, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रमाणेच येथेही संशयिताला अशी ‘ऑफर’ देण्याचा प्रकार समोर आल्याने पोलीस तपासाबाबत संशय निर्माण झाला आहे.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सहा महिन्यांनंतर कोल्हापूर पोलिसांनी सांगली येथून १६ सप्टेंबर रोजी ‘सनातन’चा साधक समीर विष्णू गायकवाड (वय ३२) याला दाट संशयातून अटक केली होती. 

पोलीस कोठडीपाठोपाठ सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या समीरकडून दोन महिने झाले तरी पोलिसांना ठोस पुरावे गोळा करता आले नाहीत. न्यायालयीन कोठडीमुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या समीरला पोलीस बंदोबस्ताचे कारण देत न्यायालयात हजर करण्यास जेल व पोलीस प्रशासनाने असमर्थता दर्शविली होती. याच वेळी समीरने अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती द्यावयाची असल्याने न्यायालयासमोर हजर करण्याची विनंती वकिलांमार्फत केली होती. 

दोन दिवसांपूर्वी जेल प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर समीरच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्या दिवशी समीरला न्यायालयासमोर हजर राहण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज केला होता. त्यामुळे आज समीरला न्यायालयात हजर करणार का? आणि तो कोणती गोपनीय माहिती देणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आजही समीरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले नाही; पण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अजित यादव यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित करीत असताना गाडीतून उतरल्यानंतर सुनावणीसाठी न्यायालयात नेत असताना माझ्याजवळ आलेल्या एका व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगून ‘साहेबां’चा निरोप असल्याचे आपल्या कानात सांगितले. ती व्यक्ती म्हणाली, ‘मी पोलीस आहे. आमच्यावर काही सामाजिक संघटनांचा दबाव आहे. त्यामुळे साहेबांचा निरोप आहे की, तुझी ब्रेनमॅपिंग चाचणी होणार आहे. त्याला तू होकार दे. यात तू आम्ही सांगतो त्यांची नावे घे. तुला २५ लाख रुपये देऊ. माफीचा साक्षीदार करू. असे न केल्यास याप्रकरणी आम्ही तुला फाशीपर्यंत पोहोचवू.’ माझ्या डोक्यावर काळे कापड असल्याने ती व्यक्ती कोण हे आपल्याला ओळखता आले नसल्याचेही समीरने न्यायालयासमोर सांगितले. याची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अजित यादव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना या संदर्भात अहवाल येत्या ५ डिसेंबर रोजी न्यायालयात सादर करण्याचा आदेश देत समीच्याही पोलीस कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ केली.

समीरचे वकीलही हे माहित नव्हतं
कळंबा कारागृहात समीरला भेटल्यानंतर त्याने गोपनीय माहिती द्यायचे असल्याचे सांगितले होते; पण अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनाही गोपनीय माहिती माहीत नव्हती. समीरला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आम्ही अर्ज केले होते; पण सरकारी पक्षाकडून याला विरोध करून वेळकाढूपणा करण्यात आल्याचे समीरचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.