ओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय. 

Updated: Oct 8, 2016, 06:56 PM IST
ओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज! title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय. 

गेली वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रिक्षा / टॅक्सी चालकांसाठी शिव वाहतूक सेनेनं 'अॅप प्रवासी सेवे'ची घोषणा केलीय. ओला-उबेर यांना टक्कर देण्यासाठी येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शिव वाहतूक सेना देखील अॅपवर आधारीत वाहतूक आणि प्रवासी सेवा सुरु करणार आहे. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन पार पडणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी उद्धवगड इथं माहिती दिली.

महिलांसाठी प्राधान्य...

यामध्ये केवळ अधिकृत परवानाधारक तसेच लायसन्स धारक (अनुज्ञप्ती पत्र) असलेल्या वाहतूकदारांनाच समाविष्ट केले जाणार आहे. शिवाय राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मीटरनुसारच प्रवासी भाडे आकारणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या अॅपमध्ये प्राधान्याने उपाययोजना केलेल्या आहेत.