खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता. 

Updated: Mar 20, 2016, 06:01 PM IST
खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट title=

मुंबई : भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता. 

हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रद्द करण्यात आला. न्यायाधीश एन.एच.पाटील आणि न्यायाधीश ए.एम.बदर यांनी या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. 
     
अंधेरी पोलिसांनी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी, १३ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

फ्लॅट सार्वजनिक स्थळ नाही. तिथे कोणीही येऊ शकत नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य करुन एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. 
     
एका पत्रकाराने १२ डिसेंबर २०१५ रोजी पोलिसांकडे शेजारच्या फ्लॅटमध्ये मोठया आवाजात म्युझिक वाजवले जात आहे, तसेच तोकडया कपडयांमध्ये नृत्य करणा-या महिलांवर पैसे उडवले जात असल्याची तक्रार केली. 
     
पोलिसांनी  तक्रारीच्या आधारावर फ्लॅटवर धाड टाकली त्यावेळी तिथे ६ महिला तोकडया कपडयांमध्ये नृत्य करत होत्या आणि १३ पुरुषांनी मद्यपान केले होते. पोलिसांनी सर्व पुरुषांना अटक करुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.