www.24taas.com, मुंबई
आज आंतरराष्ट्रीय `रोज डे` आहे. आज अनेक लोक एकमेकांना प्रेमाने गुलाब पुष्प भेट देतात. मात्र गेल्या वर्षी राज ठाकरेंना गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांना मात्र अजूनही त्याची किंमत मोजावी लागत आहे.
गेल्या वर्षी राज ठाकरेंना मंचावर जाऊन गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांची वेतनवाढ पुढील ३ वर्षं रोखूनच ठेवण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट २०१२ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. यावेळी आझाद मैदान येथे भाषणानंतर पोलीस नाईक प्रमोद तावडे यांनी मंचावर जाऊन राज ठाकरेंना गुलाबाचं फुल दिलं होतं. ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांचं हे वर्तन बेशिस्त असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
चौकशीअंती तावडे दोषी असल्याचं पुढे आलं. त्यामुळे वायरलेस संदेश विभागाचे पोलीस उपायुक्त बी. एम. यादव यांनी तावडेंचं पुढील तीन वर्षांचं वार्षिक वेतन का रोखू नये? असं विचारलं होतं. तावडेंनी आपल्या बचावाचे प्रयत्न केले. आपलं वर्तन बेशिस्त नसून आपली शिक्षा रद्द करावी, अशी मागणीही तावडेंनी केली. मात्र तरीही त्यांची शिक्षा रद्द होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.