www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.
या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी आपल्याला संलग्न असलेल्या कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करायच्या आहेत. तसंच विद्यापीठांनी असे दिनविशेष रोखण्यासाठी काय पावलं उचलली याचा अहवालही राज्य सरकारला पाठविण्याविषयी सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.
तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१० साली राज्य सरकारच्या वतीने विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता यानिमित्तानं झालीय. २०१० साली पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणींना ड्रग्ज घेऊन झिंगलेल्या अवस्थेत अटक करण्यात आली होती. फ्रेंडशिप आणि व्हॅलेंटाईनसारखे दिनविशेष साजरे करण्यातूनच रेव्ह पार्ट्यांपर्यंत विद्यार्थ्यांची मजल जाते, असं राज्य सरकारला वाटतंय. त्यामुळे यंदा राज्यातील महाविद्यालयांमध्ये फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याविषयी सूचना करण्यात आलाय.
राज्य सरकारच्या या फतव्यावर तरुणाईनं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांनी मात्र टीका केलीय. ‘व्हॅलेंटाईन्स किंवा फ्रेंडशिप डे सारखे दिनविशेष कोणतंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ आयोजित करत नाहीत. विद्यार्थी आपापल्या पातळीवर त्याचं आयोजन करतात... त्यांचा कॉलेजशी कधी संबंधच येत नाही. शाळा-कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि काय नाही, यावर कॉलेज कसं नियंत्रण ठेऊ शकेल?’ असा प्रश्न जाणकारांनी विचारलाय.
एकिकडे कॉलेजात निवडणुका घेण्याचा घाट आणि दुसरीकडे महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे, व्हॅलेन्टाईन्स डेला बंदी यामध्ये सरकारला तोंडावर पडावं लागण्याची शक्यता वर्तविली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.